अफवांचा बाजार अन भलत्याच बाता... खुलताबादेत रातचा गोंधळ बराच होता...

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) नगरपरिषद निवडणुक मतमोजणी पुढे ढकलली अन उमेदवारांना मोठा धक्का बसला. मतदान यंत्रे सुरक्षित आहे की नाहीत, याचा धसका उमेदवारांनी घेतला आहे. अशातच गुरुवारी (दि.४) मध्यरात्री नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉगरूममधून ईव्हीएम मशीन बॅगेत भरून हलवल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे उमेदवारांसह शेकडो कार्यकत्यांनी नगरपरिषद कार्यालय आणि पोलीस ठाण्याकडे धाव घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत विक्रमी ८२.२६ टक्के मतदान झाले आहे. सर्व ईव्हीएम मशीन नगरपरिषद कार्यालयातील स्ट्रॉगरूममध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री स्ट्रॉगरूमच्या बंदोबस्तासाठी असलेले एसआरपी जवान अमरावती येथे जाण्यासाठी आपले सामान (बॅगा) पोलीस व्हॅनमध्ये टाकत होते. 

याच वेळी, एका अज्ञाताने फोनवरून ईव्हीएम मशीन मोठ्या बॅगेत भरून पोलीस घेऊन जात आहेत, अशी अफवा पसरवली. ही बाब कानावर पडताच निवडणुकीत उतरलेले विविध पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे शेकडो समर्थक तात्काळ नगरपरिषद कार्यालयाजवळ जमा झाले. पोलीस व्हॅनमध्ये बॅगा टाकत असल्याचे पाहताच पदाधिकाऱ्यांनी थेट जवानांना अडवले आणि बॅगा तपासण्याची मागणी केली.

जवानांसोबत बाचाबाची...
राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सुरुवातीला बॅगेत कपडे आणि वैयक्तिक सामान असल्याचे सांगत बॅगा दाखवण्यास नकार दिला. यामुळे ईव्हीएम मशीन हलवल्याचा संशय कार्यकत्यांमध्ये अधिकच बळावला. संतप्त पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची २ माहिती खुलताबाद पोलिसांना दिली. सर्व जमाव नंतर पोलीस ठाण्यावर पोहोचला. पोलीस ठाण्यात खुलताबाद पोलिसांनी राखीव दलाच्या जवानांना बेंगा उघडून दाखवण्यास सांगितले. बॅगा उघडल्यावर त्यात ईव्हीएम नसून जवानांचे वैयक्तिक कपडे व साहित्य असल्याचे उघड झाले. परंतु, यावेळी जवान आणि खुलताबाद पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. हा सर्व घटनाक्रम मध्यरात्री १२:३० पर्यंत चालला होता.